Wednesday, February 25, 2026

खो-खो (प्रोजेक्ट)

 

खो खो

प्रा. आनंद लुंकड

प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड 

अनुक्रमणिका

  1. प्रस्तावना
  2. खो खो खेळाचा इतिहास
  3. खो खो खेळाचे क्रीडांगण – माहिती
  4. खो खो खेळाचे नियम
  5. खो खो खेळाचे तंत्र व कौशल्ये
  6. खो खो खेळाकरिता आवश्यक व्यायाम प्रकार, शारीरिक क्षमता, पूरक खेळ
  7. सामनाधिकारी – कर्तव्ये, पंच इशारे
  8. खो खो खेळाचे गुणपत्रक
  9. खो खो खेळासाठी आवश्यक साधने
  10. खो खो खेळातील विशेष पुरस्कार
  11. संदर्भ सूची

प्रस्तावना

खो खो खेळ हा भारतीय पारंपारिक खेळामध्ये सर्वात वेगवान खेळ असून या खेळाची सुरुवात महाराष्ट्रात झाली, मानवात असणार्‍या नैसर्गिक वृत्तींची जोपासना करून त्या वाढीला लावण्यास असा हा पूर्ण शरीराला व्यायाम व बुद्धीला चालना देणारा खेळ प्रकार आहे. आदि मानव काळात शिकार साधण्याचा प्रयत्न करताना शिकाऱ्याने हेरलेले सावज सापळ्यात अडकीवणे व त्यावर कब्जा मिळविणे अशी त्या काळी सहज प्रवृत्ती होती. तसेच ते हेरलेले व पाठलाग चालू असणारे सावज देखील अतिशय सावधपणे आणि चपळतेने त्याच्या मागावरील असलेल्या शिकाऱ्याला चुकविण्याचा प्रयत्न करत असे. हा शिकारी आणि शिकार / सावज यांच्यातील पाठशिवणीचा खेळ हाच खो खो खेळाचा प्रारंभ असावा. पूर्ण वेगामध्ये, चपळता, दमदारपणा, उत्साह आणि तीक्ष्ण बुद्धीचा वापर या सर्वांगीण गुण वाढीस लावणारा असा हा खेळ आहे. या खेळात चित्या प्रमाणे आक्रमक आणि हरिणा सारखे चपळ असा सुंदर मिलाफ आहे.   

खो खो खेळाचा इतिहास

वर उल्लेख केल्याप्रमाणे आदि मानव काळापासून मानव जातीत विविध प्रकारचा खो खो खेळला जात असे. वेद कालीन महाभारत युद्धात रणांगणावर खो खो खेळाचा आरंभ झालेला आढळतो. या युद्धात ‘रथोह’ नावाचा एक उल्लेख आढळतो. ‘रथोह’ म्हणजे रणांगणावर रथाचा पाठलाग करणे आणि त्या पाठलागात नागमोडी प्रकारात रथ हकावा लागे. या नागमोडी चालीमधून खो खो खेळातील साखळी ही तंत्र विकसित झाले असे आढळते. तसेच या युद्धात चक्रव्यूह हा डावपेचाचा उल्लेख होता. चक्रव्यूहात गोलाकार रचना आणि त्यात त्या रचनेच्या मुखावर उत्तम योद्धे नेमले होते. या व्यूहाचा भेद करण्याचा अभिमन्यूने अयशस्वी प्रयत्न केला. त्या वेळी कडी खेळ असे खो खो खेळातील तंत्र विकसित झाले असावे.

आधुनिक इतिहासात सर्व प्रथम महाराष्ट्रातील पुणे येथे डेक्कन जिमखाना या ठिकाणी इ. स. 1914 साली खो खो खेळाचे निमंत्रित सामने आयोजित केले गेले असा उल्लेख आहे. त्या पूर्वी पुणे येथील फर्ग्युसन या महाविद्यालयात खो खो खेळाचा सराव होत असे असा उल्लेख आहे. कबड्डी, हुतुतू, आट्यापाट्या, लंगडी या पारंपारिक भारतीय खेळाप्रमाणे खो खो खेळ देखील संपूर्ण भारतात खेळला जातो.

बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान जर्मनीचे सर्वोच्च नेते हिटलर यांच्या समोर खो खो खेळाचे प्रात्यक्षिक इ. स. 1936 साली पुण्यातील संघाने केले होते.

खो खो खेळाचे नियमांचे छापील पुस्तक इ. स. 1935 तयार केले गेले. तसेच आंतर विद्यापीठ पुरुष गट स्पर्धा इ. स. 1953 साली आयोजित केल्या गेल्या. खो खो खेळाची अखिल भारतीय खो खो संघटना इ. स. 1956 साली स्थापन झाली. खो खो चे जनक म्हणून कै. भाई नेरूळकर यांना ओळखले जाते. त्यांच्या नावाने ‘भाई नेरूळकर स्पर्धा’ महाराष्ट्रात दर वर्षी आयोजित केली जाते.

इ. स. 1960 साली खो खो खेळाची पहिली खुला पुरुष गट स्पर्धा विजयवाडा येथे घेण्यात आली.

इ. स. 1987 साली तीसऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धे दरम्यान आशियाई खो खो संघटना स्थापन झाली आणि त्याचे प्रात्यक्षिक देखील झाले. इ. स. 1996 साली कलकत्ता येथे कृत्रीम हिरवळीवर वातानुकूलित क्रीडा प्रेक्षागारात पहिली आशियाई स्पर्धा पार पडली.

दोन डाव आणि प्रत्येकी 9 मिनिट चालणाऱ्या चार पाळ्या असा हा खो खो खेळ, ज्यामध्ये तो संघ अधिक गुण प्राप्त करतो तो जिंकतो हा साधा नियम आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, उस्मानाबाद, नागपूर या जिल्ह्यामध्ये खो खो कहा प्रसार अधिक आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ख खो खेळाचे तुल्यबल संघ आहेत. गेल्या 10 वर्षात खो खो हा खेळ भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश, जपान, पाकिस्तान, इंग्लंड येथे प्रचलित होत आहे.

 

 

 

 

  खो खेळाचे क्रीडांगण – माहिती

 

चित्र. क्र.1 क्रीडांगण



क्रीडांगण – मापे


खो खो खेळाचे नियम
व खो खो च्या सामन्याचे नियम

खो खो च्या प्रत्येक संघात 12 खेळाडू, एक संघ व्यवस्थापक आणि एक संघ मार्गदर्शक यांचा समावेश असतो. संघातील 9 खेळाडू ही सामन्याची सुरुवात करतात. या बद्दल नियम पुढील प्रमाणे आहेत.

        I.            सामन्याची वेळ – पुरुष, महिला, कुमार आणि कुमार मुली गट यांची प्रत्येक पाळीची वेळ 9 मिनिटे असते. एक संरक्षण आणि एक आक्रमण असे दोन पाळ्या मिळून एक डाव होतो. असे दोन डाव मिळून एक सामना होतो. हीच वेळ किशोर मुले आणि मुली गट यांच्याकरिता 7 मिनिटे आहेत. प्रत्येक पाळी झाली की 3 मिनिटे विश्रांती आणि दोन डाव झाल्यावर 6 मिनिटे मध्यंतर असते. किशोर मुले आणि मुली गट यांच्याकरिता हीच वेळ अनुक्रमे 2 मिनिटे आणि 5 मिनिटे मध्यंतर अशी आहे.

     II.            सामन्यापूर्वी पंचप्रमुख संघनायकांना क्रीडांगणात येऊन नाणेफेक करतात. नाणेफेक जिंकणारा संघ आक्रमण अथवा संरक्षण स्वीकारतो. आक्रमण करणारा संघातील नऊ खेळाडू क्रीडांगणात येऊन त्यातील 8 खेळाडू मध्यपाटीवरील चौकोनात बसतात. 9 वा खेळाडू एका स्तंभापाशी उभा राहतो. तसेच संरक्षण करणारा संघ त्याचे तीन रक्षक खेळाडूची पहिली तुकडी क्रीडांगणात येऊन आपली जागा घेते. तीन संरक्षक बाद झाले की पुढील तीन संरक्षकांची तुकडी मैदानात प्रवेश करते. असे एकूण तीन तुकड्या एका पाळीत संरक्षण करतात.  

   III.            सामना सुरू झाल्यानंतर आक्रमण करणारा संघ संरक्षकास बाद करण्याचा प्रयत्न करतो. दोन डाव मिळून जो संघ अधिक गुण मिळवतो तो संघ विजयी घोषित केला जातो.

  IV.            दोन डाव मिळून जर दोन्ही संघ यांचे समान गुण झाले असतील तर बाद पद्धतीच्या स्पर्धेत त्या संघाचा अजून एक तिसरा डाव खेळविला जातो. या मध्ये परत एकदा समान गुण झाले तर एक ‘लघुत्तम आक्रमण’ असा अलाहिदा डाव पद्धतीने एक डाव खेळविला जातो. आणि सामन्याचा निकाल लावला जातो.

     V.            सामना पूर्ण झाल्यानंतर पंचप्रमुख निकाल घोषित करतात आणि त्या नंतर दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर जातात.

  VI.            बदली खेळाडू – सामना सुरू असताना आक्रमण करणारा संघ पंचप्रमुखाची परवानगी घेऊन कितीही वेळा खेळाडू बदल करू शकतात. संघनायक अथवा संघ प्रशिक्षक यांनी हा बदल करायची विनंती करावी. संरक्षण करणारा संघ त्यांच्या 3 – 3 च्या तुकड्या दिल्यावर पाळी सुरू झाली तर खेळाडू बदल करू शकत नाही.

VII.            खो खो खेळाडूंचा गणवेश – पुरुष आणि मुले यांना छापील क्रमांक असलेले बनियन आणि अर्धी विजार असा गणवेश असतो तर महिला आणि मुली खेळाडूंना टी – शर्ट आणि अर्धी विजार असा गणवेश असतो. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर 1 ते 12 या पैकी एक क्रमांक छापणे आवश्यक असते.          

सामना सुरू असताना सर्व खेळाडू आणि संघ प्रशिक्षक, व्यवस्थापक यांनी खेळाची शिस्त पाळणे अपेक्षित असते. त्यांनी जर बेशिस्त वर्तन केले तर पंच प्रमुख त्यांच्यावर योग्य अशी कार्यवाही करून शिक्षा करू शकतात.


 

खो खो खेळाचे तंत्र व कौशल्ये

खो खो खेळाचे आक्रमण आणि संरक्षण असे प्रमुख दोन भाग आहेत ज्याची मूलभूत आणि प्रगत अशी तंत्रे आहेत. ही तंत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

मूलभूत आक्रमण तंत्रे

1)  चौकोनात बसणे – आक्रमक खेळाडू क्रीडांगणात आखलेल्या आठ निर्धारित चौकोनात बसतात. हा चौकोन 35 से. मी. * 30 से. मी. असा असतो. (किशोर गट - 30 से.मी. * 30 से.मी.) यात खेळाडू आपल्या पायाच्या चवड्यावर बसतो आणि खो मिळाल्यावर लगेच उठण्याच्या तयारीत असतो. ही तंत्र अशा पद्धतीने सराव करून आत्मसात करावयाचे असते.

 

  

चित्र क्र. 2 चौकोनात बसणे

2)  आडवा खो देणे – ही अतिशय महत्वाचे आणि मुख्य असे तंत्र आहे. खो दिल्याशिवाय खेळ सुरू राहत नाही. खो देणे या तंत्रात खेळाडू आपल्या चौकोनाजवळ बसलेल्या दुसऱ्या आक्रमकास उठून, दोन पावले टाकून त्याच्या पाठीकडील बाजूस तळहाताने स्पर्श करून स्पष्ट आणि पंचाना ऐकू जाईल असे मोठ्याने खो म्हणणे अपेक्षित आहे. खो देताना आडव्या पाटीशी असलेला पायाचा संपर्क सुटू देऊ नये. तळहाताचा संपर्क पाठीशी होताना खो चा उच्चार झाला पाहिजे. आडवा खो दोन पद्धतीत देता येतो. दोन पावले टाकून अथवा तीन पावले टाकून आडवा खो देणे. काही प्रगत खेळाडू एक पाऊल टाकून हा खो देतात. तसेच या तंत्राचे अनेक प्रकार आहेत. उदा. लांबचा खो देणे, धावत जाऊन खो देणे इ.

खो देणे या तंत्रावर आधारित इतर सर्व प्रगत खो देण्याची तंत्रे आहेत. उदा. फसवा खो देणे, उशिरा खो देणे, अंदाज घेऊन खो देणे, त्वरित खो देणे इ. 

   

चित्र. क्र. 3  आडवा खो देणे

3)  स्तंभ वळणे – ही क मूलभूत तंत्र आहे जे आक्रमक आणि संरक्षक अशा दोघांनाही उपयुक्त असते. या तंत्रात आक्रमक दोन अथवा तीन पावले टाकून स्तंभाजवळ येतो, एका (शक्यतो ज्या दिशेने – उजवी ठाव डावी स्तंभ वळत असतो तो हात) हाताने स्तंभ पकडतो, नंतर दूसरा हात स्तंभावर टाकतो. दोन्ही हाताच्या पंजात स्तंभ पकडून त्या स्तंभाला वळसा घालणे अपेक्षि असते. अतिशय वेगात ही तंत्र करावे.

या तंत्रच अनेक उपतंत्र आहेत. उदा. दोन पावले टाकून स्तंभ वळणे, उलटे पाऊल टाकून स्तंभ वळणे, एका पावलात स्तंभ वळणे इ. ह्या तंत्रात आक्रमक पळत जाऊन अथवा लंगडी घालून अशा दोन विविध पद्धतीने स्तंभ वळतो.

  

चित्र. क्र. 4 स्तंभ वळणे

4)  आडव्या पाटीवरील हालचाली व दिशा घेणे/ बदलणे – ही अ एक पूरक आणि मूलभूत असे आक्रमणाचे तंत्र आहे. सुयोग्य खो मिळाल्यानंतर चौकणात बसलेला आक्रमक आपल्या समोरील आडव्या पाटीवर थोडे वाकून मध्य पाटीकडून बाजू रेषेकडे धावत जाऊन अंतर कापतो आणि कडी कहा खेळ करणाऱ्या संरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न करतो. तसेच गरजे प्रमाणे बाजू वळवून दिशा घेतो / बदलतो. आक्रमक आतली किंवा बाहेरची दिशा घेऊन तेथे उभ्या / पळत असलेल्या संरक्षकाला बाद करतो. या तंत्रात तो आक्रमक द्वीपाद अथवा चतुष्पाद पद्धतीने आडव्या पाटीवर हालचाल करतात.

   

चित्र. क्र.5 आडव्या पाटीवरील हालचाल


 

आक्रमणाची प्रगत तंत्रे

5)  फसवा खो देणे- आक्रमक अचानकपणे पुढे असलेल्या / धावणाऱ्या संरक्षाकाचा अंदाज बिघडवून ताकत विविध हालचाली / कृती करत फसवा खो देतो.

6)  स्तंभावर चकवा खो देण्याची कृती करून खो न देता गाळणे – या प्रगत तंत्रात चकवा खो देण्याच्या कृतीमुळे संरक्षक चकित होतो. उदा. उलटे पाऊल टाकणे, पाय ताणणे, बाजू ताणणे, इ. कृती करतो मात्र खो न देता पटकन स्तंभावर संरक्षकाच्या जवळ जातो.

7)      चवड्यावर हात टाकणे - संरक्षक जेंव्हा मधल्या पाटीवर प्रवेश करत असतो तेव्हा आक्रमकांनी कंबरेतून खाली वाकून संरक्षकांच्या चवड्यावर हात टाक करून त्याला बाद करणे असा प्रयत्न करतात.  

8)      सूर मारणे-  खो - खो खेळातील अतिशय प्रगत आक्रमक तंत्र म्हणजे सूर मारणे होय उपस्थित प्रेक्षकांना मुग्ध करून संरक्षकाला पाच ते सहा फूट अंतर हवेत झेप घेऊन बाद करण्याचा प्रयत्न सूर मारून केला जातो. आक्रमण चालू असताना अचानकपणे धावत जाऊन हवेत सूर घेऊन अंदाजे संरक्षकाला टिपण्यासाठी हे तंत्र सर्वात महत्त्वाचे ठरते याचे अनेक उपप्रकार आहेत उदाहरणार्थ धावत जाऊन सूर मारणे बसल्या जागेवर चौकोनातून उठल्यावर लगेच सूर मारणे बाजूला सूर मारणे इ.  हवेतून वळून दूर मारणे सर्वात प्रगत व अवघड तंत्र आहे.

 

 

 

चित्र. क्र.  6 सूर मारणे

9)      स्तंभावर सूर मारणे - स्तंभावर उभा असलेल्या संरक्षकाला बाद करण्यासाठी, आक्रमक स्तंभावर सुर मारतो. या तंत्रात पहिल्या पाटीवरून खांबावर जाताना,  दुसऱ्या पाटीवरून फसव्या खो ची कृती करून किंवा तिसऱ्या पाटीवरून वेगाने धावत जाताना खांबावर सूर मारणे या तंत्राचे विविध उपप्रकार आहेत.

 

चित्र. क्र.  7 स्तंभावर सूर मारणे

10)   हात टाकणे - आक्रमक तंत्रातील एक महत्त्वाचे प्रगत तंत्र आहे. तिसऱ्या पाटीवरून स्तंभावर जाताना किंवा पुढचा खो देताना तसेच संरक्षक मध्य पाटी ओलांडत असताना हात बाहेर काढून रक्षकाला बाद करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते

 

  

चित्र. क्र. 8 हात टाकणे

 

आक्रमणाचे विविध डावपेच

खो - खो खेळात, सामना चालू असताना काही डावपेच पुढीलप्रमाणे आहेत.  

11)   अचानक आक्रमण करणे

12)   दोन किंवा अधिक संरक्षक एकत्र राहणे

13)   खेळाडू बद्दल करणे

14)   पाळीची सुरुवात करताना करण्यासाठी वेगाने धावणे

15)   स्तंभाजवळ पहिल्या पाटीत बाहेर जाणे इ.

  

   

चित्र. क्र. 9 फसवा खो देणे

 

मूलभूत संरक्षण तंत्रे

आक्रमणाच्या सर्व तंत्रासोबत संरक्षणाची काही मूलभूत तंत्रे पुढील प्रमाणे आहेत. 

1)  एकेरी साखळी - संरक्षणाचे सर्वात मूलभूत तंत्र म्हणजे एकेरी साखळी होय.  खो - खो खेळात  प्रत्येक संरक्षक या तंत्राचा सर्वात जास्त वेळा उपयोग करतो. नागमोडी धावणे म्हणजे एकेरी साखळी खेळणे होय. या तंत्राप्रमाणे संरक्षक, 1 क्रमांकाच्या चौकोनात असलेल्या आक्रमकांच्या पाठीवरून मध्य पाटी  ओलांडतो.  नंतर दोन, तीन, चार, पाच, सहा असे करत दुसऱ्या स्तंभावर जातो. हे तंत्र शिकताना संरक्षकाने आक्रमकांच्या पाठीवरून मध्य पाटी ओलांडावी. प्रत्येक वेळेस मागे बघावे व वेग कमी - जास्त करावा.  एकेरी साखळीचे अनेक उपप्रकार आहेत.         उदा. 1-2-3-6- स्तंभ, 2-5-6-स्तंभ, 3-4-5-6- स्तंभ इ. 

 


चित्र. क्र.10  एकेरी साखळी

 

2)  3-6-9 ची साखळी – याला दुहेरी साखळी असे म्हणतात.  एकेरी साखळी या तंत्राप्रमाणे, मात्र तिसऱ्या वर बसलेला आक्रमकांच्या पाठीवर मध्य पाटी ओलांडावी. नंतर सहाव्या च्या पाठीवरून मध्यपाटी ओलांडत दुसऱ्या स्तंभावर धावत जावे. 2- 2 आक्रमक सोडून मध्य पाटी ओलांडावी.  उर्वरित सर्व हालचाली या एकेरी साखळी प्रमाणे असतात. एकेरी साखळीत वेगाने नागमोडी धावणे अपेक्षित असते तर दुहेरी साखळी मध्ये वेगासोबतच दमदारपणा देखील अपेक्षित आहे. 

 


चित्र. क्र.11   दुहेरी साखळी


 3)  स्तंभावर जाणे व स्तंभ वळणे-  संरक्षक एकेरी व दुहेरी साखळी मध्ये नागमोडी पद्धतीने धावत जाताना स्तंभावर जाऊन उभे रहात असतो. पाठीमागच्या आक्रमकका कडून बचाव करायचा असतो. त्यामुळे संरक्षक स्तंभावर जाताना जलदपणे व सावधपणे जात असतो. तसेच स्तंभावर उभे राहून मागे आक्रमक काय करत आहे याचा अंदाज घेऊन उभा राहतो. स्तंभाच्या  बाजूला हालचाल करत मैदानाच्या दुसऱ्या भागात प्रवेश करतो असे हे तंत्र आहे. स्तंभावर संरक्षकाला खूपच काळजी घ्यावी लागते कारण मागे मुक्त क्षेत्र असते. मैदानाच्या या भागात आक्रमकाला खो खो खेळाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नसते. तो लगेचच संरक्षकाला बाद करू शकतो. तसेच आक्रमक फसवा खो देणे, स्तंभावर सूर मारणे इत्यादी खूप प्रगत आक्रमक तंत्रे वापर करू शकतात . त्यामुळे साखळी खेळताना स्तंभावर जाणे व स्तंभ वळणे हे तंत्र खूप महत्त्वाचे ठरते.

4)  कडीचा खेळ तंत्र - यालाच चौघात खेळणे असे देखील म्हणतात.  एकेरी दुहेरी साखळी हे तंत्र संरक्षकाला मध्य पाटीजवळ खेळण्यास उपयुक्त असते. मात्र आक्रमकाने पूढचा खो दिल्यानंतर संरक्षकाला कडी खेळ तंत्र वापरावे लागते. या तंत्रामध्ये संरक्षक मध्यपाटी व्यतिरिक्त मैदानाच्या उर्वरित क्षेत्राचा स्वतःच्या बचावासाठी उपयोग करत असतो. इथे दमदारपणा व संयम अशा  क्षमतांचा जास्त वापर करावा लागतो.  या तंत्राचे अनेक उपप्रकार आहेत. 1-4 कडी खेळ, मधली कडी खेळ, 8 च्या आकड्यात कडी खेळ, सहा खेळाडूंमध्ये कडी खेळ इत्यादी.  या तंत्रात संरक्षक आक्रमकांपासून लांब अंतरावर असतो, त्यामुळे हुलकावणी देणे विश्रांती घेणे तसेच निरीक्षण करत आपला खेळ करणे या हालचाली करव्या लागतात. 


चित्र. क्र.12 कडी खेळ

 

संरक्षणाची प्रगत तंत्रे

5)  मिश्र खेळ तंत्र - एकेरी साखळी, दुहेरी साखळी व मध्येच कडीचा खेळ करणे असे मिश्र खेळाचे तंत्र संरक्षक उपयोगात आणतात. 

6)  हुलकावणी देणे-  संरक्षक काडीचा खेळ करत असताना मधेच थांबून मागे येणाऱ्या आक्रमकांना हुलकावणी देतो आणि दिशा व जागा बदलतो.  या तंत्राचा वापर संरक्षक त्याच्या मागे आक्रमक वेगाने जवळ येत असताना करतात. 

7)  कडी खेळाचे प्रगत तंत्र – उदा. 8 च्या आकड्यांमध्ये कडीचा खेळ, तिघांमध्ये कडी खेळ, सहा आक्रमकांमध्ये कडी खेळ इ.

8)  दोन संरक्षक खेळाडू एकत्र आल्यावर करणाऱ्या हालचाली-  संरक्षक या तंत्राचा उपयोग दोन किंवा तीन संरक्षक खेळाडू एकत्र आल्यावर करत असतो. यामध्ये एखाद्या आक्रमकाला टाळून घेऊन उभे राहणे किंवा अचानक बाहेर पडणे इत्यादी प्रगत तंत्रे आहेत. 

संरक्षणाचे डावपेच

आक्रमक डावपेच करत असताना या प्रत्येक डावपेचांना प्रति - डावपेच करणे असे संरक्षकाला अपेक्षित असते.  उदा. अचानक आक्रमण टाळणे, खेळाची पाळी सुरु होताना मैदानात उभे राहण्याच्या जागा,  संरक्षणाची तुकडी क्रमांक 2 किंवा 3 यांचा मैदानातील प्रवेश इत्यादी डावपेच येतात.

सर्व प्रकारचे मूलभूत तंत्र एकत्र करीत मिश्र खेळ करता करता संरक्षक स्वतःला आक्रमकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो. यासाठी त्याला वेगाने धावणे, दिशा बदलणे, योग्य अंदाज घेणे हे करावे लागते. स्वतःची  बचावाची वेळ वाढविणे  व आपल्या संघाचे कमीत कमी गुण जाऊ देणे ही दोन्ही उद्दिष्टे संरक्षकाला साध्य करायची असतात. 

 

  चित्र. क्र. 13 संरक्षणाचे डावपेच


खो खो खेळाकरिता आवश्यक व्यायाम प्रकार, शारीरिक क्षमता, पूरक खेळ -

पूरक उत्तेजक व्यायाम, विशिष्ट व्यायाम आणि शारीरिक क्षमता व पूरक खेळ

मैदानावर खेळल्या जाणाऱ्या इतर सर्व खेळांप्रमाणे खो खो खेळण्यापूर्वी काही उत्तेजक हालचाली करणे आवश्यक असते. य उत्तेजक हालचाली योग्य क्रमाने कराव्यात.

a. सर्वसाधारण उत्तेजक व्यायाम – सर्व स्नायूंचे ताणाचे प्रकार, मैदानाला 10 ते 15 फेऱ्या मारणे, जोरात धावणे, वेगात धावणे, चक्राकार हालचाली, व इतर उत्तेजक हालचाली युक्त व्यायाम करावा.

b. विशिष्ट उत्तेजक व्यायाम – सर्वसाधारण उत्तेजक व्यायाम प्रकार केल्यानंतर खो खो खेळास  आवश्यक असे काही विशिष्ट उत्तेजक व्यायाम करावेत. यात लंगडी घालणे, बाजूला धावणे, खाली वाकून धावणे, उठ बस करणे, बेडूक उड्या मारणे, उंच उड्या मारणे इ. व्यायाम करता येतात.

c. खो खो खेळातील मूलभूत तंत्र उजळणी - विशिष्ट उत्तेजक व्यायाम प्रकार केल्यानंतर खो खो खेळातील काही मूलभूत तंत्र यांचा 10 ते 15 वेळ सराव करावा. उदा. आडवे खो देणे, आडव्या पाटीवरील हालचाली करणे, स्तंभ वळणे, दिशा बदलून जोरात धावणे इ. या नंतर प्रत्यक्ष खो खो खेळाचा सराव करावा.

d. शिथिलीकरण - खो खो खेळाचा सराव केल्यानंतर शेवटी 5 ते 10 मिनिटे शिथिलीकरण व ताणाचे व्यायाम प्रकार करावेत.

उत्तेजक व्यायाम प्रकार झाल्यानंतर खो खो खेळाकरिता उपयुक्त आणि आवश्यक अशा शारीरिक क्षमता वाढीसाठी नियोजन करून व्यायाम करावा. या शारीरिक क्षमता म्हणजे चपळता, वेग, दमदारपणा, पायातील ताकद, स्नायू मज्जा समन्वय, लवचिकता, प्रतिक्षिप्त क्रिया, स्फोटक ताकद इ. या सर्व क्षमता खो खो खेळातील तंत्र अवगत करण्याकरिता अतिशय आवश्यक आहेत. या क्षमतांचा विकास नियोजनपूर्वक व वय - लिंग – खेळातील अनुभव इ. घटक लक्षात घेऊन करावा.

लहान मुलांना खो खो खेळ समजण्याकरिता  काही पूरक आणि मनोरंजक ये खेळ आहेत जे आधी सराव करून घेतले तर खो खो ची पूर्व तयारी लहान वयात होते. उदा. लंगडी, आट्यापाट्या, गोल खो खो, विष अमृत इ. या पूरक खेळांमधून खो खो ची मूलभूत तंत्रे आणि आवश्यक शारीरिक क्षमता यांचा सहज विकास होतो.


 

खो खो खेळाचे सामनाधिकारी – त्यांची कर्तव्ये, पंच इशारे

खो खो खेळाचा सामना पूर्ण होण्यासाठी सहा सामनाधिकारी नेमावे लागतात. त्या बद्दलची माहिती-

1.  पंच प्रमुख / सरपंच – एक.

संपूर्ण सामन्यांचे नियंत्रण करणे, पंचांच्या कामात मदत करणे आणि आवश्यक तेथे निर्णय देणे, खेळाडू यांना गैरवर्तणूकीची ताकीद देणे आणि गुणपत्रक तपासून अंतिम निर्णय जाहीर करणे इ. कार्य करतात.

2.  पंच – दोन

पूर्ण सामन्यांचे नियंत्रण करणे, निर्णय देणे, पंचांना एकमेकांची मदत करणे इ. कार्य करतात. 

3.  वेळाधिकारी – एक

   वेळेवर सामना सुरू करणे, वेळ संपल्याचे जाहीर करणे इ. कार्य करतात.   

4.  गुण लेखक – दोन

सामना सुरू असताना गुणपत्रकाची नोंद ठेवणे, खेळाडू बदल करणे इ. कार्य करतात.



खो खो खेळाचे गुणपत्रक


खो खो खेळासाठी आवश्यक साधने

खो खो खेळाकरिता आवश्यक साधने यादी

1.  स्तंभ – दोन (शक्यतो लाकडी) 175 से. मी. उंच आणि 9 ते 10 से. मी. घेर असलेले

2.  दोरी – 30 मीटर अंतर असलेली एक दोरी

3.  स्टील अथवा सूती अंतर मोजपट्टी - 30 मीटर अंतर मोजता येणारी एक अंतर मोजपट्टी

4.  वेळ नियंत्रण घडयाळ – दोन

5.  शिट्या – पाच

6.  गुणपत्रक

7.  समय दर्शक एक ते आठ क्रमांक असलेले छोटे फलक

8.  तांबडे आणि पिवळे ताकीद देणारे छोटे कार्ड

9.  मैदान आखण्याकरिता चुना / फक्की

 


 

खो - खो खेळातील विशेष पुरस्कार

दर वर्षी अखिल भारतीय खो - खो संघटनेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेत दिले जाणारे विशेष पुरस्कार – वयोगटाप्रमाणे यादी

वयोगट

प्रकार

पुरस्कार नाव

खुला वयोगट

पुरुष गट

एकलव्य पुरस्कार

महिला गट

राणी झाशी लक्ष्मीबाई पुरस्कार

कुमार गट -18 वर्षाखालील

कुमार मुले गट

अभिमन्यू पुरस्कार

कुमार मुली गट

जानकी पुरस्कार

किशोर गट - 14 वर्षाखालील

किशोर मुले गट

भरत पुरस्कार

किशोरी मुली गट

ईला पुरस्कार

 

महाराष्ट्र राज्य स्तर पुरस्कार

दर वर्षी महाराष्ट्र राज्य स्तरावर खेळाडूंना दिले जाणारे पुरस्कार (मागील तीन वर्षीय कामगिरी)

v शिव छत्रपती पुरस्कार – खेळाडू

v शिव छत्रपती पुरस्कार – प्रशिक्षक

v शिव छत्रपती पुरस्कार – संघटक

या व्यतिरिक्त भारतीय स्तरावर इतर सर्व खेळाप्रमाणे दिले जाणारे पुरस्कार –

Ø अर्जुन पुरस्कार – खेळाडू

Ø गुरु द्रोणाचार्य पुरस्कार – प्रशिक्षक


संदर्भ सूची

1.  खो खो नियम, 2003, महाराष्ट्र खो खो असोसिएशन

2.  Kho Kho Rules, Ed 2013, भारतीय खो खो संघटना

3.  भारतीय खेळ – खो खो, 2001, प्रा. डॉ. वाकचौरे माधुरी

4.  खेळांची नियमावली, 1996, प्रा. डॉ. झाडबुके जगदीश

5.  फर्ग्युसन महाविद्यालयाचे क्रीडा क्षेत्रातील 125 वर्षांचे योगदान, 2013, प्रा. डॉ. आम्रुळे मोहन

6.  आरोग्य व शारीरिक शिक्षण – इ. 12 वी शिक्षक हस्तपुस्तिका, 2013, महारासगटर राज्य शिक्षण मंडळ

7.  www.kkfi.org

8.  www.mkka.org

9.  www.nmspune.org

10.www.wikipedia.org       

 

v सदर माहिती पुस्तिकेतील छायाचित्रे श्री. भूषण कदम यांनी ‘खेलो इंडिया 2019’ ,पुणे येथील स्पर्धेतील घेतली आहेत. तसेच त्यांना त्याचे स्वामित्व अधिकार प्राप्त आहेत. त्यांचे धन्यवाद.

No comments:

Post a Comment

KABBADDI PROJECT

  कबड्डी डॉ. उमेश अरुण बिबवे म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स , पुणे प्रस्तावना (Introduction) कबड्डी हा आपल्या भारत देशातील एक प्राच...